बहिणींचा लाडका भाऊ – काँग्रेसचा राजाभाऊ कँपेन सुरू
कल्याण दि.७ ऑक्टोबर :
आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या आणि निराधार महिलांसाठी कल्याण शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्याकडून एक अनोखी योजना लागू करण्यात आली आहे. येत्या दसरा आणि दिवाळीचे निमित्त साधून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मोफत सिलेंडर रीफिल उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मध्य प्रदेश काँग्रेस प्रभारी संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
काँगेसचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य राजेश (मुन्ना) तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, युवक काँग्रेस अध्यक्ष जपजीत सिंग आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे गरिबांच्या समस्यांची, त्यांच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. या पार्श्वभमीवर एक सामाजिक बांधिलकी म्हणून दसरा – दिवाळीच्या निमित्ताने आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चाने ही योजना राबवणार असल्याची माहिती राजाभाऊ पातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. च कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना लागू असणार असून त्याअंतर्गत निराधार, परितक्त्या, घटस्फोटित झालेल्या महिलांना त्याचा लाभ घेता येणार असल्याचेही या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.
या योजनेचा असा मिळवा लाभ…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 7699444555 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील न्यूटेक डायग्नोस्टिक सेंटर, टिटवाळा गणेश मंदिरसमोरील कार्यालय आणि मोहने येथे या उपक्रमासाठी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याठिकाणी संपर्क साधून महिलांनी हा लाभ मिळवण्याचे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केले आहे.
—–