दिल्ली, दि. २६ ॲागस्ट :  नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केल्या आहेत.

खर्गे म्हणाले की, अत्यंत कठिण काळात ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले व लोकांच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. 

गावचे सरपंच, विधानपरिषद, विधानसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य, लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून नांदेड जिल्ह्याचा विकास करणे हे हेच ध्येय ठेवून ते सतत कार्यरत होते. राजकारणासोबतच शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. 

 काँग्रेस विचाराचा निष्ठावान पाईक हरपला !

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. वसंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परस्थितीत एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेस विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने अनुभवी लोकप्रतिनिधी व काँग्रेस विचारांचा एक निष्ठावान पाईक हरपला आहे, अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

नाना पटोले  म्हणाले की, खा. वसंतराव चव्हाण यांनी सरपंचपदापासून राजकीय कारकिर्द सुरु केली, त्यानंतर जिल्हा परिषद व विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नांदेड मतदारसंघातून विजय मिळवून राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुरुवात केली होती. नांदेड जिल्ह्यातील पक्ष संघटना वाढीत त्यांचा मोठा वाटा होता. खा. वसंतराव चव्हाण मनमिळावू, प्रामाणिक व मितभाषी स्वभावाचे होते, त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. 

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *