मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज विधानभवनात निवडणुक अधिकाऱ्यांकडे सादर केला. यावेळी राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र  चव्हाण,   भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  आमदार ॲड. आशिष शेलार, प्रवीण दरेकर,  प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीयमंत्री पीयुष गोयल व भाजपचे नेते उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यातून राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी उदयनराजेंची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पीयुष गोयल यांच्या जागी धैर्यशील पाटील यांना संधी देऊन भाजपचे त्यांचे पुनर्वसन केले असल्याचे मानले जात आहे.

‘शेकाप’चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील यांना रायगडमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने ही जागा भाजपला मित्र पक्षासाठी सोडून द्यावी लागली. पाटील यांची लोकसभेची संधी हुकल्यामुळे त्यांना यावेळी भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *