कल्याण: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज सकाळी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले.  न्यायालयाने त्याला  दि  २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

बदलापूर पूर्वेला असणाऱ्या आदर्श  शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर अक्षय शिंदे याने शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन अत्याचार केले होते. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात चालढकल झाल्याने बदलापूर शहर आणि रेल्वे स्थानकात मंगळवारी उग्र आंदोलन झाले होते. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बदलापूरमध्ये तणाव कायम आहे. 

अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या आदर्श शाळेतील  एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती.  अक्षय शिंदे याच्याविरोधात सध्या प्रचंड जनक्षोभ आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला थेट कोर्टात न आणता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, न्यायालय परिसरात प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करुन अक्षय शिंदे याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आले.  आज त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असून, याप्रकरणाची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने अक्षय शिंदे याची रवानगी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

  या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूरमध्ये दाखल झाल्या. बदलापूरमधील  ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तिथे जाऊन आरती सिंग या तपासाची सूत्रे हाती घेणार आहेत. यानिमित्ताने ठाण्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलापूरमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीआयजी आरती सिंग या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. एसआयटी पथकात कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश होणार, कोण तांत्रिक पुरावे गोळा करणार, कोण घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करणार, तपासाची दिशा नेमकी कशी असेल, याबाबतचे निर्णय या बैठकीत होतील. त्यानंतर आरती सिंह अधिकृतरित्या बदलापूर पोलिसांकडून तपासाची सूत्रे स्वीकारतील. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नराधम अक्षयचे तीन लग्न, तिन्ही बायका सोडून गेल्या,  धक्कदायक माहिती 

दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या खरवई येथील घरावर गावकऱ्यांनी हल्ला करून घरची तोडफोड केली आहे. आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ २४ वर्षे असले तरी त्याचे आधीच तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. अशी धक्कादायक माहिती  समोर आली आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहतो. त्याचे  शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली. अक्षय शिंदे हा  खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली. या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत. गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते. पण कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *