शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार  प्रकरण  !

बदलापूर :  पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर  लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज बदलापूरमध्ये उमटले. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करीत  बदलापूरकरांनी थेट रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे तब्बल तीन तास कल्याण कर्जत मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली.  

दरम्यान  पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. रेल्वे रुळावर ठाण  मांडून बसले. दोषीला फाशी अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून सुरु आहे. पोलीस लाठीचार्जच्या  प्रयत्नात  असतानाच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे वातावरण गंभीर बनले. 

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत एका सफाई कर्मचाऱ्याने साडे तीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला आहे. हे प्रकरण सात दिवसांनी समोर आले आहे. चिमुकल्यांच्या पालकांनी याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवले. आता शाळा प्रशासनाने सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द केला आहे. तसेच शाळेने सर्व पालकांची जाहीर माफी मागितली आहे. घडलेला प्रकार घृणास्पद आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असा संस्थेचा प्रयत्न आहे. आम्ही पूर्ण क्षमतेने पोलिसांना सहकार्य केले आहे, असे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.   

हे प्रकरण समोर आल्यानंतर आता नागरिक प्रचंड संतापले आहेत.  शाळेच्या बाहेर महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने जमले आहेत. नागरिक येथे घोषणाबाजी करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सात दिवस झाले तरी या प्रकरणावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे देखील नागरिक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आहेत. लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जमले असून त्यांनी लोकल ट्रेन रोखल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

शाळेत घुसून शाळेची तोडफोड

बदलापूरमधील एका शाळेतील हे प्रकरण समोर आल्यानंत बदलापूर तसेच समस्त महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीला शाळेने हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला. तक्रार करायला गेलेल्या पालकांना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल १२ तास ताटकळत ठेवले. त्यामुळेही नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.  

दोषीला फाशी आंदोलकांकडून घोषणाबाजी

बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी ज्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता, त्या शाळेती तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झालेल्या आंदोलकांनी दगडफेक करत घोषणाबाजी केली आहे. दोषीला फाशी अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून सुरु आहे.

मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील, जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही : एकनाथ शिंदे , मुख्यमंत्री

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, गुन्ह्याच्या तपासासाठी  एसआयटी स्थापन करण्याचे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. : देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!