भिवंडी महापालिका आयुक्त कार्यालयात जप्तीची कारवाई

भिवंडी : शहरातील रस्ता रूंदीकरणांत गेलेल्या जागेच्या बदल्यात  पालिकेकडून पर्यायी जागा  न मिळाल्याने जागा मालकाने भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.या दाव्याप्रकरणी महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून झालेल्या दिरंगाईने गुरुवारी महानगरपालिकेवर जप्तीची नामुष्की ओढवली.भिवंडी न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टाच्या बेलीफने आयुक्त कार्यालयातील खुर्च्या,सोफा,पंखे ,झेरॉक्स मशीन व संगणक जप्त केले आहे.शहरातील कासारआळी घर क्र.1, जुना वाडा स्टॅण्ड येथे रामभाऊ रावण घाडगे यांचे किराणा दुकान होते.हे दुकान सन 1992 साली पालिकेने रस्ता रूंदीकरणासाठी तोडले.त्याबदल्यात पालिका प्रशासनाने घाडगे यांना एस.टी.स्थानकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ 8 बाय 10 फुटाची जागा दिली होती.उपलब्ध जागेवर घाडगे यांनी स्वत: शेड बांधल्यानंतर सन 2003 साली ती पुन्हा पालिका प्रशासनाने तोडली.त्यामुळे त्यांनी रस्ता रूंदीकरणात गेलेल्या जागेबदली पर्यायी जागा मिळण्यासाठी पालिका प्रशासनास विनंती केली होती.मात्र तत्कालीन मुख्याधिकारी,आयुक्त व शहर विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे रामभाऊ घाडगे यांनी भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.मात्र या दाव्याकडे पालिकेचे विधी अधिकारी व नियुक्त वकील पॅनेलने दिरंगाई करून दुर्लक्ष केल्याने भिवंडी कोर्टाने पालिकेतील फर्नीचर,पंखे,झेरॉक्स मशीन व संगणक आदी वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले होते.या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी कोर्ट बेलीफ रघुनाथ पगारे व जे.एम.भामरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या आयुक्त कार्यालयात दाखल झाले होते.त्यांनी आयुक्त डॉ.योगेश म्हसे यांची भेट घेऊन कोर्टाचे आदेश बजावून आयुक्त कार्यालयांतील दोन सोफे,खुर्च्या,संगणक,झेरॉक्स मशीन जप्त करून कोर्टाच्या भंडारगृहात नेले.या घटनेप्रकरणी आयुक्त डॉ.म्हसे यांची भेट घेतली असता त्यांनी ‘सदरची बाब ही सन 1992 सालातील असून न्यायालयाच्या कारवाईमुळे विधी विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून या घटनेत संबधितांनी न्यायालयाला माहिती उपलब्ध केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे यात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.असे आयुक्त म्हसे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *