डोंबिवली : कोलकात्यातील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थीनीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेने 17 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 18 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आयएमएने शहरात निषेध मोर्चाही काढला होता. आयएमएने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीतील डॉक्टरांनी बिगर आपत्कालीन सेवा बंद ठेवल्या होत्या.

शनिवारी आयएमएने विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. या सभेत या घृणास्पद घटनेचा निषेध ठराव संमत करण्यात आला. तसेच आयएमएतर्फे संध्याकाळी निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये आयएमएसह निमा, आयडीए या वैद्यकीय संस्थांच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जवळपास 350 हून अधिक व्यक्तींनी डोंबिवलीतील टिळक चौक चौक ते घरडा सर्कलपर्यंत निषेध फलक आणि मेणबत्ती हाती घेऊन शांततेत मोर्चा काढला काढून निषेध नोंदवला.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करून दोषींना कडक शिक्षा व्हावी. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांसह डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा करण्याची मागणी डॉ. मंगेश पाटे यांनी केली. या प्रसंगी आयएमएच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष डॉ. शरद गुरव, सचिव डॉ. सुशील शिंदे, निमा अध्यक्ष डॉ. मनीषा मोघे, आयडीए अध्यक्ष डॉ. सौरभ दनित यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती. शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाजवळ सांगता झाल्यानंतर आयोजकांनी आंदोलनस्थळ झाडून स्वच्छ केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!