पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या यात्रेला विरोध करत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. नितेश राणे गो बॅक, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
नितेश राणे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरुन सध्या आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पोलिसांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काही पोलिसांकडून हिंदूंना डावललं जात असल्याचं सांगत नितेश राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. सध्या हिंदू जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून ते दौरा करत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूरमधील गढीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आमदार नितेश राणे, ह.भ.प.संग्राम बापू भंडारे पाटील, सागर भैया बेग यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. राणे यांचा मोर्चा नेहरू चौकातून मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सकल मराठा समाजाचे आंदोलक जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. तसेच, जवळपास दहा आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. आश्रम फरतडे नावाच्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले.