अर्ज बाद झालेल्या महिलांनी शासकीय संस्थांमार्फत पुन्हा अर्ज करण्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन

कल्याण दि. १५ ऑगस्ट : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कल्याण तालुक्यातील १ लाखांहून अधिक अर्ज मंजूर झाल्याची माहिती कल्याण पश्चिम समिती अध्यक्ष आणि आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. तर अर्ज बाद झालेल्या महिलांनी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, केडीएमसी अधिकारी, गटविकास अधिकारी किंवा शिवसेनेतर्फे यासाठी उभारण्यात आलेल्या केंद्रातूनच अर्ज दाखल आवाहनही आमदार भोईर यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या या योजनेसंदर्भात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी दाखल होणारे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. या समितीची बैठक आज अध्यक्ष आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली केडीएमसीच्या स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली.

जाहीर झाल्याच्या तारखेपासूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम उद्यापासून सुरुवात होणार आहे. कल्याण तालुकाही त्यामध्ये मागे नसून पाहिल्या टप्प्यामध्ये या योजनेसाठी तब्बल १ लाख ६ हजार ५०० महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १  लाख ४९७ अर्ज मंजूर झाले असून हमीपत्रात देण्यात आलेली चुकीची माहिती आणि इतर तांत्रिक कारणामुळे उर्वरित अर्ज बाद झाले असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.

मात्र अर्ज बाद झालेल्या महिलांनी निराश न होता त्यांना अर्ज करण्यासाठी अटी शिथिल करण्यासह शासनाकडून आणखी एक शेवटची संधी देण्यात आली आहे. तसेच या महिलांनी आपल्या मोबाईलमधून हे अर्ज दाखल न करता आशा सेविका, अंगणवाडी सेविका, केडीएमसी अधिकारी, गटविकास अधिकारी किंवा शिवसेनेतर्फे यासाठी उभारण्यात आलेल्या केंद्रातूनच अर्ज दाखल करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहनही आमदार भोईर यांनी केले आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत येणाऱ्या वैध अर्जांचाच शासनाकडून विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान केडीएमसीमध्ये आज झालेल्या या बैठकीला समिती सचिव तथा उपायुक्त स्वाती देशपांडे, नायब तहसीलदार नितीन बोडखे, समाज विकास अधिकारी प्रशांत गव्हाणकर, बालविकास अधिकारी अजय फडोळ, संरक्षण अधिकारी भाग्यश्री बच्छाव, समिती सदस्या साधना गायकर, विद्या मोहिते आणि विधानसभा क्षेत्रातील आशा सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *