सावंतवाडी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विधानसभा निहाय तीन दिवसीय जनता दरबार पार पडला. या जनता दरबाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नेहमीच्या कार्यशैलीप्रमाणे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांच्या समस्येवर, तक्रारींवर तातडीने निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या जनता दरबारामुळे जिल्हावासीयांचे बराच काळ प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी तीन दिवसीय विधानसभा मतदारसंघ निहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील नागरिकांसाठी जनता दरबार बुधवारी ओरस येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडला. यावेळी सावंतवाडी परिसरातील नागरिकांनी आपले विविध प्रश्न पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडले. विविध शासकीय विभागाशी संबंधित असलेले जनसामान्यांचे प्रश्न नीट समजून घेत आणि ते सोडविण्यासाठी आवश्यक त्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ३०१ पैकी २४० अर्ज तातडीने निकाली काढण्यात आले. उर्वरित अर्जांचे निराकरण देखील लवकरात लवकर करण्यात येईल असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तर कुडाळ विधानसभा मतदारसंघातील ३५९ अर्जांपैकी २८६ अर्जांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. कणकवली विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबार नागरिकांनी मांडलेल्या ७८ अर्जांपैकी ७४ अर्जांचे तातडीने निराकरण करण्यात आले.
जनसामान्यांचे प्रश्न हे ठराविक कालमर्यादेत सोडवण्यात येतील, याचा आपण वेळोवेळी आढावा घ्यावा, असे निर्देश यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्हावासीयांना सर्व शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. गेल्या ३ दिवसांत जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लावण्यात आल्या असून त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बरगे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सीईओ मकरंद देशपांडे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कातकरी समाजाला मिळाले हक्काचे घर !
कणकवली विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबारात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या घराचा प्रश्न निकाली काढण्यात आला. ज्या कातकरी समाजाला आजवर भूमिहीन रहावे लागले, त्या समाजातील सुमारे ७०-७५ कुटुंबांना ओसरगांव येथून अवघ्या ५०० मी. अंतरावर असणारी जमीन उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे या कुटुंबांना हक्काचे घर मिळाले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आपले स्वप्नं पूर्ण झाल्याने कातकरी समाजाने मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.