बीड : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज बीड मध्ये करून रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या. त्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत ताफा अडवणाऱ्यांना इशारा दिला आहे. ताकीद दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगत आहे, सुरूवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहे. त्यामुळे भविष्यात मनसे विरुद्ध उबाठा वाद रंगण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. राज ठाकरे आज बीड दौऱ्यावर असतानाच त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. राज ठाकरे सुपारीबाज आहेत असं म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या. पोलिसांनी त्यांना आवरलं आणि राज यांच्या ताफ्याला वाट करून दिली.
राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली, आरक्षणाविरोधात बोललेलं आम्ही सहन करणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. आतापर्यंत मराठवाड्यात मराठा आंदोलकांच्या रोषाला राज ठाकरेंना सामोरं जावं लागत होतं. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन केलं. एकीकडे हा विरोध असताना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज ठाकरेंचं जंगी स्वागत होतंय.
राज ठाकरे यांचे बीड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केवळ राजकीय विरोधातून हा प्रयत्न झाला आहे. याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांना हॉटेलमध्ये बोलावून घेत ही घटना घडण्यापूर्वी आपले इंटेलिजन्स नव्हते का? असा सवाल केला. अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती, भविष्यात असे प्रकार होऊ नये असेही राज ठाकरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितले.