कल्याण : एका वयोवृद्ध महिलेच्या पेन्शनच्या पैशांवरून नातेवाईक भिडले आणि त्यातून थेट बँकेतच एका गटाने दुसऱ्या गटावर चाकूने हल्ला केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण मधील बँक ऑफ बडोदा शाखेत घडली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी हल्लेखोर हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कल्याणमध्ये राहणारे राहुल परमार आणि विजय परमार यांची आजी सेवानिवृत्त झाली, पेन्शनचे पैसे बँकेत आले म्हणून दोघे भाऊ आजीच्या पैशांसाठी बँकेत पोहोचले. बँकेत पैसे काढण्यास गेले असता त्या ठिकाणी प्रथमेश चव्हाण, नाथा चव्हाण आणि मयूर चव्हाण त्या ठिकाणी पोहोचले. आजीच्या पैशांवर आमचा देखील हक्क आहे, आम्हाला पैसे हवेत यावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.
बँकेचे कर्मचारी हैराण झाले बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांना शांत करून बँकेच्या बाहेर पाठवलं. मात्र हा राडा तिथेच शांत न होता, बँकेच्या गेटवर पुन्हा या दोन्ही गटात वाद झाला. त्यात तिघांनी दोघांवर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात राहुल परमार आणि विजय परमार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणातील हल्लेखोर तिघे फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंगर आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होतच घटनेचा सीसीटीव्ही आपला ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी आम्ही तीन पथक नेमले आहेत लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे.