पत्रकार केतन बेटावदकर हल्ल्याप्रकरणी चौघांना बेडया : २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
आयएमएचा पोलिसांवर ठपका
कल्याण : येथील पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी बुधवारी महात्मा फुले पोलिसांनी चौघांना बेडया ठोकल्या. योगेश भोईर, महेश भोईर, अनमोल भोईर आणि हरेष पाटील अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावं आहेत. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
सोमवारी हॉली क्रॉस रूग्णालयात रोहित भोईर या २२ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्य झाला होता त्यावेळी त्याच्या संतप्त नातेवाईकांनी हॉली क्रॉस रूग्णालयाची तोडफोड केली हेाती. यावेळी वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले एलएनएनचे प्रमुख केतन बेटावदकर यांच्यावर जमावाने सशस्त्र हल्ला केला होता. त्या हल्ल्यात बेटावदकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मीरा रूग्णालयात उपचार सुरू आहे. बेटावदकर यांच्या वरील हल्ल्याचा सर्वच स्थरातून तीव्र निषेध करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केलीय.
पोलिसांच्या हलगर्जीपणा कारणीभूत : आयएमएचा आरोप
हॉलीक्रॉस हॉस्पिटलची झालेल्या तोडफोडीस पोलिसांचा हलगर्जीपणाचा कारणीभूत असल्याचा आरोप इंडियन मेडीकल असोसिएशनने केलाय. सोमवारी झालेली हॉस्पिटलची तोडफोड व डॉक्टारांना मारहाण आणि पत्रकारावर जीवघेणा हल्ला या पार्श्वभूमीवर इंडियन मेडीकल असोसिएशनने बुधवारी कल्याणात बैठक घेतली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनच्या पदाधिका-यांनी आरोप केला. येत्या ४ तारखेपर्यंत या हल्ल्यातील आरोपींना अटक न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही असोसिएशनने दिलाय. राष्ट्रीय सचिव डॉ. मंगेश पाटे, राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व डॉक्टर मोठया संख्येने उपस्थित होते.