कल्याण : ठाकुर्ली – कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान आज दुपारच्या सुमारास  ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक यामुळे तब्बल एक तासापासून ठप्प झाली आहे. लोकल ट्रेन खोळंबल्याने प्रवाशांनी  ट्रेनमधून उतरुन पायी चालत ठाकुर्ली रेल्वे स्टेशन गाठलं. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे रडगाणे सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप  सहन करावा लागत आहेत.

ओव्हरहेड वायर तुटल्याने कल्याण ठाकुर्ली दरम्यान लोकल थांबविण्यात आल्या आहेत. कल्याणहून सीएसटी कडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा सुरू आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठा आवाज झाला त्यामुळे प्रवासी घाबरले. ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकवर गाडी थोडी स्लो होताच घाबरलेल्या प्रवाशांनी स्लो ट्रेन मधून खाली उतरून पायी स्थानक गाठलं. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात आला. तब्बल तासाभरानंतर कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल सुरू झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून लोकल सेवेचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ थांबून राहिल्याने  अंबरनाथ ते कर्जत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेवरील बिघाड हे आता प्रवाशांना रोजच असल्याने दररोजचा मनस्ताप सहन करावा लागतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *