विधान परिषद निवडणुकीसाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
मुंबई (संतोष गायकवाड) : माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांना मंत्रीपदाने चांगलीच हुलकावणी दिलीय. मंत्रीमंडळाचा विस्ताराची तारीखही पुढे पुढं सरकू लागलीय. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार आता फेब्रुवारीत होणार असून, त्याचवेळी राणे हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. विधान परिषदेत एक जागा वाढण्यासाठी भाजपने ही राजकीय खेळी केलीय. त्यामुळे आता फेब्रुवारीतच राणेंच्या मंत्रीपदाला मुहूर्त मिळणार आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिलाय. राणेंनी आमदारकिचा राजीनामा दिल्याने त्या रिक्त जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. भाजपकडून राणेंना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पण ही आशाही फोल ठरलीय. शिवसेना आणि नारायण राणे यांचे विळया भोपळयाचे नातं आहे. त्यामुळे राणेंच्या उमेदवारीला व त्याचा मंत्रीमंडळाच्या समावेशास शिवसेनेने विरोध दर्शविलाय . विधानसभेत भाजपचे वर्चस्व असले तरी विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. विधान परिषदेची एक- एक जागा जिंकणे हे भाजपसाठी महत्वाचे आहे. भाजपने राणेंना उमेदवारी दिली असती तर शिवसेनेचा विरोध पत्करावा लागला असता. तसेच त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले असते. या सगळया पार्श्वभूमीचा विचार करून भाजपने राणे यांना निवडणुक रिंगणात न उतरविता प्रसाद लाड यांना उमेदवारी दिलीय. राणेंना उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना खुष झालीय. त्यामुळे हिवाळी अधिवेशन सुखरूपपणे पार पडणार आहे, त्याशिवाय भाजपच्या कोटयात विधान परिषदेची एक जागाही वाढणार आहे असा दुहेरी फायदा भाजपने साधलाय. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाअगोदर होणारा मंत्रीमंडळाचा विस्तार पुढं ढकललाय. फेब्रुवारी महिन्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन राणे मंत्री बनणार आहेत.जूलै महिन्यात विधान परिषदेचे ११ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामध्ये 5 सदस्य हे भाजपचे आहेत. त्यावेळी भाजपच्या कोट्यातूून राणे यांना आमदार म्हणून निवडून आणले जाणार आहे असेही सूत्रांनी सांगितले.