मुंबई, दि. 23ः भाजपप्रणित केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाही. बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मात्र भरीव तरतूद केली आहे. सर्वाधिक कर महाराष्ट्रातून मिळतो. परंतु,  केंद्राच्या अर्थसंकल्पात राज्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. केंद्राला महाराष्ट्राबाबत इतका आकस का, असा खरमरीत सवाल शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्स या हॅंटडवरून उपस्थित करत केंद्र आणि महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश, बिहारसाठी विशेष निधीची तरतूद केली. महाराष्ट्राचा साधा उल्लेख अर्थसंकल्पात केलेला नाही. महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? संविधान विरोधी सत्तेला महाराष्ट्राने आळा घातला आहे. भाजपप्रणित सरकारने त्यामुळे सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्रावर राग काढला का, असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित केला. तसेच दिल्ली समोर लाचारी करणाऱ्या महायुती सरकारला या अर्थसंकल्पातून काय मिळाले. राज्यातील उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करून शासनाची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचे राजकारण करायला येते. परंतु, केंद्राकडून ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा मिळाला. केंद्राकडून निधी आणायला आणि राज्याचे भले करण्याची धमक महायुती सरकारमध्ये नाही, अशी टीका आदित्य यांनी केली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *