प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न

मुंबई, दि. १९ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने २३७ जागा जिंकून भाजपाला रोखले आहे. आजही देशातील वातावरण इंडिया आघाडीचेच असून महाराष्ट्रात काँग्रेस व मविआसाठी चांगले वातावरण आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तर भाजपा मात्र धनदांडग्यांबरोबर आहे हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुक होत आहे. ही विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस मविआसाठीचे लक्ष्य आहे आणि ही निवडणूक जिंकावीच लागेल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शन करताना के. सी. वेणुगोपाल बोलत होते ते पुढे म्हणाले की, सर्वांनी एकजुटीने मतभेद विसरून जातीय धर्मांध शक्तींना पराभूत करायचे आहे. भाजपच्या राज्यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, दलित, अल्पसंख्यांक आदिवासी कोणीही सुखी आणि सुरक्षित नाही. जनतेचे हित जोपासण्यासाठी भाजपाला सत्तेतून खाली खेचलेच पाहिजे.

यावेळी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे, महाराष्ट्रात काँग्रेस सक्षम व पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. आता विधानसभा निवडणूक जिंकून महाविकास आघाडीचे सरकार बनवायचे आहे. निवडणूक ही एक लढाई आहे, ती व्यवस्थित लढली तरच विजय प्राप्त होतो. लोकसभेत विजय मिळवला म्हणून अतिआत्मविश्वास बाळगू नका, भरपूर मेहनत करावी लागणार आहे. राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मविआचे सरकार आणा असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी संघटनात्मक कार्यक्रमांची रुपरेषा आखलेली आहे. २३ जुलै रोजी जिल्हा कमिटींच्या बैठकांचे आयोजन केले आहे. २५ ते ३० जुलै ब्लॉक मिटिंग होतील तर १ ते १० ऑगस्ट दरम्यान बुथ लेवलच्या बैठका आयोजित करुन संघटन मजबूत करण्यावर भर द्यायचा आहे. लोकसभेला जसे नवे चेहरे दिले तसेच विधानसभेलाही नवीन चेहरे दिले जातील, महिलांनाही संधी दिली जाईल. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांची २० ऑगस्ट रोजी जयंती आहे या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या सभेतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल असेही चेन्नीथला म्हणाले.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केले आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पाठवले. शेतकरी संकटात आहे, २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करत नाही पण उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करते.
उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राची अधोगती केली आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर हे असंवैधानिक सरकार पायऊतार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळेच काँग्रेसने देशाचे संविधान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान रक्षणाचा संकल्प केला आहे.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाला मोठ्या संकटात लढावी लागली, पक्षाची सर्व बँक खाती गोठवली, काही नेत्यांवर कारवाया केल्या, काहींना अटक केली, अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवली पण जनतेचा प्रतिसाद काँग्रेस इंडिया आघाडीला मिळाला तसेच राहुल गांधी यांच्या संघर्षालाही जनतेने साथ दिली. महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर मविआ १८० जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक, उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, विरोधी पक्षनेचे विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *