मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपून काढलं आहे, संततधार पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.मुंबईसह उपनगरात पडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर, हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणा-या चाकरमण्यांचे हाल झाले. 

रात्रीपासून सुरू असलेल्या या संततधारेमुळे मुंबई आणि उपनगरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. आज देखील राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.हवमान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

कोकणात देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

रत्नागिरी आणि गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट (लाल रंगाचा दक्षतेचा इशारा)
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या ९ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट  
मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात आणि पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट (पिवळ्या रंगाचा दक्षतेचा इशारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *