डोंबिवली : आदिवासी विद्यार्थी अत्यंत निष्ठावंत तसेच संस्कृतीप्रिय असतात. प्रामाणिकता हा विशेष गुण त्यांच्यात असतो. या विद्यार्थ्यांची बुध्दी तल्लख असते. कुठलेही परिश्रम करण्यास ते मागेपुढे पाहत नाही. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. असे सुप्त गुण अनेक विद्यार्थ्यांमध्ये असतात. फक्त क्षमता ओळखून त्यांना चालना दिली तर त्यांचा शैक्षणिकच नव्हे तर सर्वांगीण विकास नक्कीच होईल, असे प्रतिपादन रो. राजेंद्र पाटील यांनी केले.
रोटरी ग्रामीण मंडळातर्फे जिल्हा परिषदेच्या बापसई येथील मामनोली केंद्राच्या शाळेत जवळपास 90 विद्यार्थ्यांना खाऊसह वह्या, पेन, पेन्सिल, खोडरब्बर, आदी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता आव्हाड, सरपंच सुरेखा टेंभे, म्हारळचे शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत म्हात्रे, पत्रकार बजरंग वाळुंज, चिंचपाड्याचे सामाजिक कार्यकर्ते भावेश म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मामनोली केंद्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकाच नव्हे तर जिल्हास्तरीय खेळांमध्ये प्रावीण्य मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सामर्थ्य उंचावण्यासाठी शाळा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांमुळे शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत चालली आहे. इमारत आणि सोयी-सुविधांकडे लक्ष दिल्यास शाळेचा दर्जा, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यात प्रशासन कधीही कमी पडणार नाही, असा विश्वास मुख्याध्यापिका सुरेखा टेंभे यांनी व्यक्त केला.
म्हारळचे शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत म्हात्रे म्हणाले, आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांतील सप्तगुणांना चालना देण्यासाठी सरकारचे नेहमीच प्रयत्न असतात. समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक जण साक्षर व्हावा, या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशा योजना आखल्याची माहिती दिली.