मुंबई, दि. ११ः राज्यात तरूणपिढी ड्रग्ज विळख्यात सापडली आहे. ड्रग्ज माफियांचा बिमोड करण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकांनी कारवाईचा धडाका सुरू केला. त्यानुसार अवघ्या पाच महिन्यात ६५२९ कारवाया केल्या असून ४ हजार १३१ कोटींचा माल जप्त केला. तसेच ड्रग्ज माफियांना संगनमत करणाऱ्या सहा पोलीसांना बडतर्फ केल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार भाई जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुंबईसह राज्यातील वाढत्या ड्रग्ज विक्रीच्या घटनांकडे लक्ष वेधले. सरकारने ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, बाबत खुलासा करावा, अशी मागणी केली. फडणवीस यांनी या प्रश्नांवर उत्तर दिले.

राज्यात अंमली पदार्थाचे मोठे आव्हान उभे असून चिंतेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना ‘संयुक्त कृती आराखडा’ सादर केला. सध्या ड्रग्ज विक्रीचे विविध केंद्र देशभरात सुरू आहेत. कुरीअर मार्फत, इस्ट्राग्राम, फेसबूक चॅट किंवा अन्य मॅसेंजरच्या माध्यामातून विक्री होत असल्याचे समोर आले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारी विक्रीही मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे एक शून्य सहनशीलता धोरण शासनाने हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथक नेमले आहेत. सर्वांची एकत्रित बैठक घेऊन, सविस्तर अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा, अशी सक्ती केली आहे. समुद्र किनारची बंदरे असो किंवा अन्य ठिकाणीच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी डॅग्ज स्कॅनर लावले आहेत. त्यामुळे कोणत्या कंटेनरमध्ये कुठलाही अमली पदार्थ शोधण्यास मदत होईल. तसेच तंत्रज्ञानाद्वारे नवीन विक्री केंद्र कशाप्रकारे संपवता येतील, यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एका प्रकरणाची लिंक उत्तराखंडला मिळाली. तेथील पोलिसांची समन्वयाचा साधून कारवाई सुरू केल्याची माहिती फडणवीस यांनी म्हटले.

६ हजार कारवाया; ४१३१ कोटींचा माल जप्त

सन २०२३ मध्ये मुंबईत ४ कोटी रुपयांचा माल पकडला होता. तर संपूर्ण महाराष्ट्रात मागील वर्षी १२ हजार ६४८ कारवाया केल्या. त्यात ८९७ कोटी रुपयांचा माल मिळाला होता. यंदा जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ६ हजार ५२९ कारवाया केल्या आहेत. यात ४ हजार १३१ कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच या सगळ्या प्रकारात पोलिसांचा सहभाग असल्यास तातडीने त्यांना बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यापूर्वी ६ पोलिसांना बडतर्फ केल्याचे फडणवीस यांनी परिषदेत स्पष्ट केले.

पोस्ट ऑफिस, कुरीयर कंपनीला सूचना

कुरियर कंपन्या आणि भारतीय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ड्रग्ज विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक कुरीयर कंपन्या आणि पोस्ट ऑफिसना भेटी दिल्या आहेत. दरम्यान, ड्रग्ज विक्रीवर कशा प्रकारे बंधन घालता येतील, याबाबत सूचना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *