मुंबई, दि. 8 : मुंबईतील ड्रंक अँण्ड ड्राइव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून ड्रंक अँण्ड ड्राइव्ह प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही मुंबई महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.

            विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहन चालकांचे परवाना रद्द करण्यात यावेत. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टॉरन्ट चालू ठेवण्याची वेळ, ध्वनिप्रदुषणाचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा सुरू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या आहेत.

            मद्य सेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्री  शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *