मुंबई, दि. ८ : मुंबईसह ठाणे, पालघर व आजूबाजूच्या जिल्ह्यांना रविवारी (७ जुलै) मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे आज, सोमवारी (८ जुलै) सकाळीपासूनच नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडल्याने चाकरमण्यांना त्याचा फटका सहन करावा लागला. पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेच्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला.  याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममधून परिस्थितीचा आढावा घेतला.   विक्रमी पावसामुळे पाणी साचलं होतं, पण आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलं. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री  शिंदे यांनी   दिली.

   मुख्यमंत्री  शिंदे यावेळी म्हणाले की, एरवी मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुना भट्टी, सायन याभागात पाणी साचले.. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महानगरपालिकेने पंप बसविले आहेत.

एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या होल्हिंग पाँण्डस् मुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 सकाळपासूनच आपण रेल्वे, बीएमसी आणि राज्य आपत्ती विभागाच्या मुख्य सचिवांच्या संपर्कात आहे. रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मी एनडीआरएफ प्रमुखांसह आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या दलांशीही सकाळी चर्चा केली आहे. त्यांना अलर्ट राहण्याची सूचना करण्यात आली आहे. कुठे काही झाले आणि त्यांची मदत लागली, तर आपल्याला ती घेता येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

 मुंबईतील सुमारे ५ हजार ठिकाणांवर मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *