मुंबई : 
राज्य विधिमंडळाचे गुरुवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन हे खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन असेल, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत पदवीधर निवडणूक मतदानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांनी वांद्रे पूर्व येथील महात्मा गांधी विद्यालयात मतदान केले. पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब सोबत होते.

ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी यांनी वापर केला. पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यातील भाजपाविरोधी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार गेल्या दहा वर्षांत मोदी यांना झाला नाही, असे ठाकरे यांनी सुनावले आहे. तसेच गेल्या दहा वर्षांत मोदी आणि त्यांच्या गुजराती ईस्ट इंडिया कंपनीने देश चालविण्याच्या नावाखाली उत्सव, इव्हेंट, नाटक केली. मोदी आता म्हणतात की, देशाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा, पण दहा वर्षांत विरोधी पक्ष फोडून त्यांना कमजोर करण्याचे काम मोदी यांनी केल्याचे ठाकरे यांनी सांगत मोदींवर निशाणा साधला. 

देशात विरोधी पक्ष टिकूच द्यायचा नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि बाहेर जे कोणी देशाच्या तसेच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतील अशांना भाजपात आणायचे किंवा तुरुंगात टाकायचे. हे मोदी यांचे धोरण विरोधी पक्ष मजबूत करण्याचे होते काय? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि बाहेर दहा वर्षे जे केले त्यास नौटंकी असेच म्हणतात. आता तेच मोदी बहुमत गमावल्यावर थोडे जमिनीवर आले आणि संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलून गेले की, देशाच्या जनतेला संसदेत नौटंकी, हंगामा, नारेबाजी नको आहे. त्यांना एक चांगला आणि जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे. मोदी यांनी हे सांगणे म्हणजे हुकूमशहाने गीता वाचण्यासारखेच आहे, अशी कोपरखळी सुद्धा ठाकरे यांनी लगावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *