डोंबिवली, दि २४ : तपोवन एक्सप्रेस ने कल्याण रेल्वे स्थानकावरून माहेरी डोंबिवलीला घरी परतत असताना धनश्री धनवटे ही प्रवासी महिला सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली. कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या आत मध्ये दागिन्यांची हरवलेली बॅग शोधून पुन्हा त्यांना परत केल्याने अखेर त्यांचा जीव भांड्यात पडला.

मूळच्या डोंबिवली आजदेपाडा येथे राहणाऱ्या धनश्री धनवटे यांचा विवाह अहमदनगर येथे राहणारे आर्मी ऑफिसर मयूर धनवटे यांच्यासोबत झाला आहे. सध्या त्यांचे पती जम्मू येथे आपले कर्तव्य बजावीत आहेत. घरी माहेरी डोंबिवलीला परतण्यासाठी काल सायंकाळी त्या अहमदनगर वरून नाशिकला बसमधून आल्या. त्यानंतर संध्याकाळी ६:३० वाजता नाशिक स्थानकातून तपोवन एक्सप्रेस रेल्वेने डोंबिवलीत घरी परतण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ९;३०च्या सुमारास उतरल्या होत्या .त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या.त्यात एकामध्ये कपडे तर दुसऱ्या काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये अडीच तोळ्याचे छोटे मंगळसूत्र ,दोन अंगठ्या, कर्णफुले असा सुमारे तीन लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज ठेवला होता. रात्री फलाट क्रमांक सहावर कल्याण येथे उतरल्यानंतर घरी डोंबिवलीला जाण्यासाठी त्या एक नंबर वर लोकल पकडण्यासाठी घाई गडबडीत बॅग तिथेच विसरून पुढे निघाल्या.

दरम्यान लोकल गाडी पकडण्यासाठी फलटवून उतरता असताना धनश्री यांना लक्षात आले की आपले दागिन्यांची बॅग दिसत नाही, आपण कुठे विसरलो हे त्यांना आठवत नसल्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधेरी आली होती . त्यांनीही बाब तात्काळ आपले पती मयूर यांना कळविले. त्यांनी त्यांना धीर देऊन जवळील कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन बॅग हरवल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तात्काळ एक नंबर प्लॅटफॉर्मवर असलेल्या सीसीटीव्ही रूम मध्ये त्यांना तपासणी करण्यासाठी पाठवले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही रूम मध्ये जाऊन सर्वत्र शोध घेत असताना याच दरम्यान कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस हवालदार विजय माने यांना फलट क्रमांक सहावर काळ्या रंगाची एक अनोळखी बॅग सापडली. रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत धनश्री यांची बॅग शोधून दिल्याने त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!