मुंबई, दि. २१ः मराठ्यांप्रमाणे ओबीसींची राज्य मंत्रिमंडाळाची उपसमिती नेमणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. दरम्यान, बनावट दाखले घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. तसेच सगेसोयरेच्या बाबतीत ही पावसाळी अधिवेशनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन, सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले की, सरसकट ओबीसींचे जात प्रमाणपत्र मिळावे. सगेसोयऱ्यांबाबत विचार व्हावा, या मराठा समाजाच्या मागण्यांवर बराच उहापोह झाला. त्यातील त्रुटी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. एससी, एसटी आणि ओबीसींना जात प्रमाणपत्र कसे द्यावे, जात पडताळणी कशी करावी, या संदर्भात संपूर्ण माहिती असलेले पुस्तक आहे. या सर्वांची पूर्तता करून जात प्रमाणपत्र दिले जाते. गेल्या वीस ते पंचवीस वर्षात त्याला कोणीही आव्हान दिलेले नाही. सगेसोयरे संदर्भात वेगळे निर्णय घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वांना विश्वासात घेण्यात येईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे भुजबळ म्हणाले.
मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्रास बनावट ओबीसीचे जात प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, आता जात प्रमाणपत्राला आधार कार्ड जोडण्याचा पर्याय पुढे आला आहे. योजनांचा लाभ घेण्यास फायदेशीर ठरेल. तसेच बनावट दाखले देण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र, बनावट दाखला घेताना किंवा देताना आढळून आल्यास दोघांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भुजबळ म्हणाले. दुर्बल घटकातील समाजाच्या घरांवर होणाऱ्या हल्ल्या विरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पुणे आणि वडगोद्री येथे उपोषण पुकारले आहे. उपोषणाचा शुक्रवारी नऊवा दिवस आहे. हे उपोषण मागे घेण्यासाठी राज्याचे मंत्रिमंडळ जाऊन त्यांनी विनंती करणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. ओबीसी नेता असल्याने हे आंदोलन मागे घेण्यास आम्हाला यश येईल, असेही ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचे राजकीय करिअर संपवण्याच्या आव्हानाला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.