नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी हे रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार असून केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी हे रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे वायनाडची खासदारकी गांधी कुटूंबियांकडेच राहणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवल्याने राहुल गांधी दोन मतदारसंघातून खासदार आहेत. पण, त्यांना दोन पैकी एक खासदारकी कायम ठेवून दुसऱ्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवत वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासाठी वायनाडची जागा सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
प्रियंका गांधीची पहिली पोटनिवडणूक
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवसांत निर्णय घ्यायचा होता. नियमानुसार, ४ जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निकालानंतर १४ दिवसांच्या आत राहुल गांधी यांना एक खासदारकी सोडायची होती. आता राहुल गांधी यांनी रायबरेलीत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची बहीण प्रियंका गांधी वायनाडच्या रिक्त जागेवरून पोटनिवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वायनाड पोटनिवडणूक लढवणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रियंका गांधी यांची ही पहिली निवडणूक असणार आहे.