मुंबई, दि. ११ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंच्या धर्तीवर सकस आहार देण्याचे सरकारचे उद्दीष्ट्ये आहे. त्यामुळेनव्या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात मसाले भात, पुलाव, अंडा पुलाव, मुगडाळ खिचडी, वरण भात, तांदळाची खीर, नाचणी सत्व आदी १५ पदार्थ देण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रिडा शिक्षण विभागाने घेतला आहे.
सरकारकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १२ ग्रॅम प्रथिने युक्त तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो. आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी अन्नधान्य, तृणधान्य अन्य पदार्थाचा समावेश पौष्टिकता वाढविण्यासाठी होतो. विद्यार्थ्यांच्या आहारात वैविधता आणण्यासाठी शासनाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने पाककृतीसह योजनेत सुधारणा करण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार तांदूळ, डाळी आणि कडधान्यापासून तयार केलेला ताजा सकस आहार, मोड आलेले कडधान्य, नाचणी सत्व, खीर यांच्यासोबतच पुलाव, खिचडी आणि मसाले भात विद्यार्थ्यांना देण्याचे ठरवले आहे.
पंतप्रधान पोषण आहार शक्ती निर्माण योजनेंतर्गत २०२४ ते २५ या शैक्षणिक वर्षासाठी १५ प्रकारची पाककृतीचा तक्ता तयार केला आहे. प्रत्येक दिवशी या प्रमाणे एक आहार सूची तयार करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यात वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल. राज्यातील प्रत्येक शाळांनी या स्वरूपातील आहार विद्यार्थ्यांना द्याव्येत, अशा सूचना शालेय शिक्षण व क्रिडा शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच राज्यातील शालेय स्तरावर धान्याचा पुरवठा प्राथमिक शिक्षण संचालक विभागाने करावा. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणता पदार्थ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तर राज्यातील महापालिका क्षेत्रात शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून घ्यावा, असे निर्देश राज्यपालांच्या आदेशानुसार अवर सचिव प्रमोद पाटील यांनी काढले आहेत.
*****