कल्याण : मोबाईल चोरीच्या उद्देशाने चोरट्याने हातावर काठीचा प्रहार केल्यानंतर चालत्या लोकलमधून जगन जंगले हा तरुण प्रवासी रुळावर पडल्याने त्याला दोन्ही पाय गमवावे लागले होते. तरुणाच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर कल्याण पूर्वेचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी एक लाख रुपयाची आर्थिक मदत केली तर हॉस्पिटलकडून त्याच्यावर मोफत उपचार करणार आहेत.
कल्याणात राहणारा जगन हा 22 मे रोजी आपले काम आटपून रात्री 9 वाजता दादर ते कल्याण असा लोकलने प्रवास करत होता. ठाणे स्थानकात लोकल येताच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे कळव्याच्या दिशेने ट्रेन धीम्या गतीने पुढे जात असताना काही टवाळखोरांनी मोबाईल चोरीच्या उद्देशाने दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीने प्रहार केला यावेळी दरवाजात थांबलेल्या जगन जंगले यांच्या हातावर जोराचा आघात झाल्याने तो लोकल खाली पडल्याने दोन्ही पाय रुळाखाली आले. दोन्ही पाय गमावल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या आणि तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे. त्याला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण शहर कक्षप्रमुख चंद्रसेन सोनवळे, युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड, अक्षय गाडे आदि उपस्थित होते. त्याचबरोबर पुढील उपचारासाठी मदतीचा हात म्हणून त्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली. त्याचबरोबर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी द्वारे सहकार्य केले जाणार असल्याचे यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितले. महेश गायकवाड यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाळ सिंह यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करणार असून याअगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचे जाहीर केले. याबद्दल महेश गायकवाड यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले.