शेजारील कंपन्यांसह दुकाने आणि रहिवासी इमारतींचे मोठे नुकसान

डोंबिवली दि.23 मे : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 4 जण ठार तर 33 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणाहून अग्निशमन दलाने चार जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे. तर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान या हार्डनर बनवणाऱ्या कंपनीतील रिॲक्टरचा आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की त्यामुळे शेजारील कंपन्या, दुकाने आणि रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले. शेजारील कंपन्यांमध्ये आग पसरून तर स्फोटामुळे अनेक दुकानांच्या आणि रहिवासी इमारतीमधील घरांच्या काचा फुटल्या. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाही. 2016 मध्ये याच ठिकाणी झालेल्या प्रोबेस स्फोटाची आठवण आजच्या या दुर्घटनेने झाली. ज्यामध्ये 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

आजचा स्फोट हा साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. तर त्यापेक्षा लांब दूरवरून या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे – धुराचे लोळ आकाशात उठल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्यामध्ये आतापर्यंत आगीमध्ये जळालेल्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तर केडीएमसी अग्निशमन दलासोबतच एनडीआरएफची एक टीम आणि औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर हलवणार, एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई मिळणार – खा.डॉ. श्रीकांत शिंदे …

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना खा.डॉ. शिंदे यांनी सांगितले की डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याची मागणी याआधी झालेल्या अशाच प्रकारच्या घटनांनंतर केली जात आहे. त्यावर आता राज्य शासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल. इथल्या केमिकल कंपन्यांचे एबीसी असे वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्यात याव्यात. मात्र या कंपन्या स्थलांतरित करताना कोणाच्याही नोकरीवर गदा येणार नाही याचा नक्कीच विचार केला जाईल असेही खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून यातील नुकसानग्रस्तांचे एक आठवड्याच्या आत पंचनामे करण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्यधिकाऱ्यांना दिले असून त्यानंतर तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल असेही खा.डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

नऊ वर्षांपूर्वीच्या स्फोटाची आठवण

१६ मे २०१६  रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन १२ जणांचा मृत्यू झाला होता तर दोनशे वर नागरिक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते.   आज तिच पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होवून झाली आहे. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. तो अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही आणि त्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आता पुन्हा तेच तेच चौकशा समित्या नेमली जाणार का ?  प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमी होऊन जायबंदी झाले होते त्यांनाही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही आहे. आज झालेल्या स्फोटाने अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे समजले आहे. इमारतींना स्फोटाचा वेळी मोठे हादरे बसले. एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. सदर भागात काही लोखंडी भागांचे अवशेष पडल्याचे दिसत आहे. स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभयीत झाले असून असे काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी मधील अती धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्यात याव्यात ही येथील जनतेची मागणी आता तरी पूर्ण करा अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली.

परिस्थिती नियंत्रणात : मुख्यमंत्री शिंदे 

कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कंपनीत बाॅयलरचा स्फोट झाला त्यानंतर आग लागली. जिल्हाधिका- यांशी चर्चा केली आहे बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत सर्वच यंत्रणा पोहचली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 

डोंबिवलीची घटना वेदनादायक : फडणवीस 

डोंबिवलीच्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी ट्विट करीत दु:ख व्यक्त केले आहे या आगीत आठ जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत जिल्हाधिका-यांशी माझी चर्चा झाली असून एनडीआरएफ टीडीआरएफ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो असं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

चौकशी करणार : रविंद्र चव्हाण 

स्थानिक आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले डोंबिवली स्फोटाची घटना अतिशय गंभीर आहे या स्फोटामुळे जखमी झालेल्या रूग्णांवर होणा-या उपचारांना यश यावे अशी प्रार्थना आहे ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत याबाबत प्रशासनाला योग्य  त्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. 

डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या ४ जूननंतर स्थलांतरीत करणार : उदय सामंत 

डोंबिवली : एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एमआयडीसी परिसरातील धोकादायक कंपन्या स्थलांतर करण्याची मागणी डोंबिवलीकरांनी अनेक दिवसांपासून लावून धरली होती मात्र आचारसंहिता असल्यामुळे हे काम थांबलं होतं ४ जूननंतर केमिकल कंपन्या शिप्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सामंत यांनी सांगितले. 

सामंत म्हणाले, डोंबिवलीतील सर्व धोकादायक कंपन्या शिप्ट करण्यात येणार आहे वर्षभर यावर काम सुरू आहे जागा शोधण्यात आली आहे मात्र अद्याप जागेचे वाटप करण्यात आलेलं नाही डोंबिवलीकरांच्या मागणीवर धोरणात्मक निर्णय घेतला  आहे त्यासाठी अंबरनाथ परिसरात शेकडो एकर जागा घेण्यात आली असल्याचं सामंत यांनी सांगितलं

 कंपनीतील आग आटोक्यात आली असून सहा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांनी दिली. दुर्घटनेतील सर्व जखमींचा खर्च सरकार उचलणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं जाहीर केलं आहे मात्र घटना दुदैवी आहे या कंपन्यांमध्ये नियमबाह्य काही झालं आहे का ? याची तपासणी करण्याच्या सूचना अग्निशमन दलाला दिल्या आहेत तसंच या घटनेची सखाेल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *