आज बुद्ध पौर्णिमा  बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र सण समजला जातो. भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी घडल्या. त्यामुळे या दिवसाला खूपच महत्व प्राप्त आहे. 

वयाच्या ३५ व्या वर्षी, बोधगया येथे एका वटवृक्षाखाली ध्यान करत असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. या घटनेलाच “बोधिज्ञान” म्हणतात. ३५ व्या वर्षी सम्यक समबुध्द बनले. ४५ वर्षे त्यांनी ज्ञान मार्ग दाखवला.  वयाच्या ८० व्या वर्षी कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. याचा अर्थ त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून निर्वाण प्राप्त केले. 

एकेकाळी भारतातून लुप्त झालेला बौध्द धर्म डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पून्हा पुनर्जीवित केला. तथागतांच्या जन्माच्या २५०० व्या वर्षी धम्म चक्राचे ख-या अर्थाने पुन्हा प्रवर्तन करण्याचे कार्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आदरणीय भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूर येथे बुध्द धम्माची दीक्षा घेतली. नंतर त्याच दिवशी नागपूर येथे दीक्षा भूमीवर जमलेल्या त्यांच्या लक्षावधी अनुयायांना बाबासाहेबांनी बध्द धम्मांची दीक्षा दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बौध्द धर्माचे थोर उपासक बौध्द धर्म प्रवर्तक व महान बोधीसत्व होते.  

तथागतांच्या हयातीत महाराष्ट्रात बुध्द धम्माचा शिरकाव 

महाराष्ट्रात बुध्द धम्माचा शिरकाव इसपूर्व ४८३ सालापूर्वी म्हणजे तथागतांच्या हयातीतच झाला याबद्दल काही पुरावे मिळतात  ” महाष्ट्रातील बौध्द धम्माचा इतिहास ” या पुस्तकात लेखक  मा.श. मोरे यांनी याविषयी विस्तृतपणे मांडले आहे.  थेर गाथामध्ये अर्हत पुण्ण (पूर्ण) आणि अर्हत ईसिद्दिना यांचेबद्दल माहिती दिलेली आहे. अर्हत पुण्ण ठाणे जिल्हयातील सोपारा येथील व्यापारी होता. पालि वाडंमयात सोपा-याला सुप्परका असे नाव आहे. त्यावेळी सुप्परका हे पश्चिम भारतातील एक प्रसिध्द बंदर आणि व्यापारी केंद्र होते. सुप्परका येथील व्यापारी पुण्ण याने श्रावस्ती येथे तथागतांकडून दीक्षा घेतली. धम्माचे पूर्ण ज्ञान झाल्यावर तो परत सुप्परका येथे आला आणि तेथे विहार बांधून धम्म प्रचाराचे काम करू लागला. ईसिदिन्ना हा सोनापरांत देशातील व्यापारी होता. धम्मज्ञान प्राप्त झाल्यावर त्याने विहार बांधून धम्मप्रचार केला असे थेर गाथेमध्ये सांगितले आहे ईसिदिन्ना हा बहुतेक गोवा महाड किंवा वाई येथील रहिवासी असावा  असे या पुस्तकात म्हटले आहे. 

सोपारा येथेच भगवान बुध्दांनी कृष्ण आणि गौतम या प्रबळ राजांना धम्म दीक्षा दिली कृष्ण नावाच्या राजावरून सोपा-या शेजारच्या डोंगराला कान्हेरी असे नाव पडले. गोदावरी नदी किनारी पैठणजवळ वसाहत रून राहिलेला बावरी आणि त्याचे सोळा शिष्य तसेच सोपा-याचा पूर्ण आणि कोकणातील ईसिदिन्ना यांच्यासंबधी माहिती वाचली असता असे निश्चितपणे सांगता येईल की बुध्द धम्माचा प्रसार तथागतांच्या हयातीतच महाराष्ट्रात झाला होता. नागपूर जवळील पवनी येथील नुकत्याच झालेल्या उत्खननावरून हे सिध्द होते की विदर्भात सुध्दा इसपूर्वी चवथ्या आणि पाचव्या शतकात बुध्द धम्माचा प्रचार फार मोठया प्रमाणावर झाला होता. 

 बुध्द कोणताच अवतार नव्हते 

आतापर्यंत भगवान बुध्दांच्या चरित्राविषयी, जन्म, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण या विषयी सांगितले जाते. बुध्द सामान्य व्यक्ती होते, बुध्द ज्ञानी होते कि बुध्द अवतार होते. अशी वेगवेगळी चर्चा  आपण नेहमीच ऐकत असतो.  वास्तविक भगवान बुध्द कोण होते ? भगवान बुध्द विशेष का होते. त्यांच्या आतमध्ये काय गुण होते.  त्रिपिटकमध्ये काय सांगितले आहे  हे आपण जाणून घेतले पाहिजे. भारतातून श्रीलंकेत अभ्यास करण्यासाठी गेलेले  निरोध भंतेजी म्हणतात, भगवान बुध्द सामान्य व्यक्ती नव्हते. युगे युगे आणि कल्प कल्पाच्या नंतर  मनुष्य जातीत बुध्द जन्म घेतात. शंभर कल्पात केवळ आणि केवळ सात भगवान बुध्द जन्माला आले.  भगवान बुध्दांमधील अनंत गुण हे ९ गुणांमध्ये समाविष्ट आहे. अरहंत,   सम्मासंबुध्द, विज्जाचरण संपन्न, सुगत , लोकविदू , अनुत्तरपुरूषोधम्म सारथी, सथादेवमनुष्यानी, बुध्द, भगवा हे गुण हेाते.

 भगवान बुध्द हे अवतार होते असा अनेकांचा प्रश्न असतो. पण सत्य एकच आहे, ते कोणताच अवतार नव्हते. त्रिपिटक वाचल्यानंतर हे ज्ञात होते. त्यांना जर अवतारच संबोधायचा असेल तर ते पुण्यचा अवतार हेाते, ते सत्यचा अवतार होते असे भंतेजी सांगतात. त्यामुळे भगवान बुध्द हे कोणाचा अवतार होते ही भ्रामक कल्पना असून लोकांमध्ये पसरलेला गैरसमज आहे असे भंतेजी सांगतात. 

दुःख निवारण्याचा मार्ग

गौतम बुध्द यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करूणा या तत्वांची शिकवण दिली. बौध्द धर्म हा स्वातंत्रय, समता, बंधुत्व, करूणा, मैत्री, प्रेम, प्रज्ञा, मानवी मूल्ये विज्ञानवाद या तत्वांचा पुरस्कर्ता आहे. कोणीही सांगितलेला नाही असा भगवान बुध्दांनी मुक्तीचा मार्ग  सांगितला.  व्याधी, आजारपण,  म्हातारपण, मरण हे दु:खकारक आहे. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासून ही दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे. दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते.माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही असे बुद्धांनी सांगितले. भगवान बुद्धांनीही जगाला पंचशीलची शिकवण दिली. पंचशील म्हणजे हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका आणि  मादक पदार्थांचे सेवन करू नका. सध्या समाजात घडणा-या महाभयंकर घटना पाहिल्यानंतर बुध्दांच्या शिकवणीची आज खरी गरज वाटते.  

संतोष गायकवाड, पत्रकार

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *