मुंबई : मुंबई हे शहर फक्त स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न जगतं. काहीतरी करून दाखवणाऱ्यांना मुंबईने कधीही निराश नाही केलं. या शहरासाठीच्या २०४७ सालचे ड्रीम घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्याला एक संकल्प करून विकसित भारत घडवायचा आहे. त्यामध्ये मुंबईचं योगदान मोठं असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना देत मोदीला बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात जय भवानी, जय शिवाजी अशी केली. मोदी म्हणाले की, गेल्या दहा वर्षात देशाला पाचव्या क्रमांकावर घेऊन गेलो, येत्या काळात भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. माझ्याकडे १० वर्षांचा रिपोर्ट कार्ड आहे आणि पुढच्या २५ वर्षांत रोडमॅप आहे. पण इंडिया आघाडीकडे काय आहे? जेवढे पक्ष तेवढे पंतप्रधान त्यांच्याकडे आहेत. त्यांची नजर ही महिलांच्या मंगळसूत्रावर आणि मंदिरातल्या सोन्यावर आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीवर केली.
मोदी म्हणाले, भारतासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश हे भारताच्या पुढे गेलेत. कमी भारतीयांमध्ये नव्हती तर इथल्या सरकारमध्ये होती. मी असे काही पंतप्रधान पाहिलेत की, त्यांनी लाल किल्ल्यावरून भारतीयांना आळशी म्हटलं आहे. ते देशाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधींजींनी सांगितलं होतं की काँग्रेस बरखास्त करा. तसं असतं तर देश किमान पाच दशकं पुढे असता. या सत्ताधाऱ्यांनी देशाची पाच दशकं ही वाया घालवली.
राम मंदिर बनणार नाही, ते अशक्य आहे असं लोकांना वाटायचं. गेल्या 500 वर्षात जे काही झालं नाही ते मोदीने करून दाखवलं. काश्मीरमधून 370 कलम हटवणं हे अनेकांना अशक्य वाटत होतं, आज त्या अशक्यतेला मी गाडून टाकलंय. काँग्रेसने गेल्या ६० वर्षांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं, पण मी ते करून दाखवलं असेही मोदी म्हणाले. ज्यांचं वय हे 70 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्या रुग्णालायतील मोफत उपचाराची, जबाबदारी ही मोदीची असेल असेही आश्वासन त्यांनी दिलं.