पुणे, 24 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंडळ पाचमध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यातील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश आहे.गेल्या काही दिवसात शहर परिसरात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुंडांनी दहशत माजविली आहे.
उपनगरातील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर या भागात गुन्हेगारांची दहशत आहे. शहरातील पोलीस ठाण्याची पाच परिमंडळांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र परिमंडळ पाचचे आहे. या भागात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अन्य परिमंडळांच्या तुलनेने जास्त आहे.