हिंगोली: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसणार नाहीत. एकनाथ शिंदे यांचे काम संपलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या भाकितामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बिडी चव्हाण यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब आंबेडकर हिंगोलीमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या सभेत आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले की, १७ लाख कुटुंब ज्यांची किमान मालमत्ता ५० कोटींची आहे, ते हा देश सोडून गेलेत. हे सगळे हिंदू आहेत. मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत. हिंदू महासभा बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना मी विचारतोय तुम्ही कोणत्या तोंडाने मोदीला पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात ? तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तुम्ही राज्य करताय की पिळवणूक करताय?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

नरेंद्र मोदी २०२४ साली पुन्हा सत्तेत आले तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. देशाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला असेल. जो ऐकणार नाही त्याला जेलमध्ये टाकले जाईल. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास NRC आणि CAA लागू करतील. बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही, अशी ग्वाही दिली जाते. बाबासाहेब १९५६साली आपल्यातून निघून गेले. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास घटना बदलल्याशिवाय राहणार नाही. हे थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात मतदान करा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरु आहेत. अशात लोकसभा निवडणुकीत भाजपला शिंदे यांना सोबत घेऊन म्हणावा तसा फायदा न झाल्यास विधानसभेला वेगळे चित्र दिसू शकते, अशा चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!