बारामती : बारामतीतून अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने केली आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा जिंकण्याचा चंग भाजपाने मांडला आहे. आता बारामती येथून काही वेळा पूर्वी शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांच्या नाव जाहीर केल्याच्या काही वेळातच अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
सुप्रीया सुळे बारामतीत विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रीया सुळे, अशी लढत होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.