भिवंडीत दुर्घटनेत मृतांची संख्या तीनवर ; ९ जण जखमी : मालकही अटकेत
ढिगाऱ्याखाली नागरिक असल्याची भीती
भिवंडी : भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत संध्याकाळ पर्यंत मृतांची संख्या 3 झाली असून 9 जण जखमी आहेत. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून अजून नागरिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी इमारतीचा मालक ताहीर अन्सारी याला पोलिसांनी अटक केलीय
ही इमारत ५ वर्षापूर्वीच बांधण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले मात्र या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. बचाव कार्यासाठी तळोजा येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे ४० जवान घटनास्थळी दाखल झाले असून पालिकेचे आपत्ती निवारण व अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या ढिगाऱ्याखालून रहिवाश्यांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महापौर जावेद दळवी,खासदार कपिल पाटील,आमदार महेश चौघुले,आ.रूपेश म्हात्रे,उपमहापौर मनोज काटेकर,सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे ,प्रभारी पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब,पोलीस उपायुक्त मनोज पाटील,प्रांतअधिकारी डॉ.संतोष थिटे,तहसीलदार शशिकांत गायकवाड,उपायुक्त दिपक कुरळेकर,विनोद शिंगटे आदींसह विविध पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून जखमी व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मृतांची नावे
रुकसार याकुब खान (१८ ) , अशफाक अहमद खान (४०) ,जैबुनिसा रफिक अंसारी ( ६१)
जखमींची नावे
आशीफ याकुब खान (१९) आयुब खान (५८) शकील अलादिया अन्सारी (३७),सलमा अन्सारी (३५) रोहन खान (७) ख्वाजा मोहमंद सैयद (५५) आबिद खान (२१) ,शाबीरा याकूब पठाण (४५) ,इमराना खान (२२)