डोंबिवली : टिटवाळा, डोंबिवली, कल्याण, पनवेल परिसरात घरफोड्या करणाऱ्या डोंबिवली जवळील देसलेपाडा येथे राहणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका भागातून मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण दोन लाखाचा सामान पोलिसांनी जप्त केला आहे.
राम उर्फ शिवा फुलचंद कनोजिया (४३) असे आरोपीचे नाव आहे. तो देसलेपाडा येथील अमर म्हात्रे चाळीत राहतो. डोंबिवली, कल्याण परिसरात चोऱ्या करणारे बहुतांशी चोरटे शहरा लगतच्या बेकायदा चाळींमध्ये राहतात. स्थानिक भूमाफियांकडून या चाळीतील खोल्या चोरट्यांनी भाड्याने विकत घेतात. चोऱ्यामाऱ्या करून यायचे आणि गुपचूप चाळीत लपून राहायचे, अशी या भुरट्या चोरट्यांची पध्दत आहे.
टिटवाळा, कल्याण, पनवेल, डोंबिवली परिसरात घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करणारा एक सराईत चोरटा शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका परिसरात पिस्तुल घेऊन फिरत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ टाटा नाका येथे राम कनोजिला पिस्तुलासह अटक केली. कनोजियाच्या विरोधात एकूण सहा गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
वरिष्ठ निरीक्षक कदबाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, महेश राळेभात,प्रशांत आंधळे, फौजदार भानुदास काटकर, हवालदार राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, अनिल घुगे, विकास माळी या पथकाने पार पाडली.