मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटकरीता शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’, श्रीकांत भिडे दिग्दर्शित “भेरा” आणि मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची निवड झाल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिली.

फ्रान्स देशातील कान येथे  १४ ते २२  मे २०२४ या कालावधीत हा महोत्सव संपन्न होणार आहे. महामंडळामार्फत सन २०१६ पासून कान  महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठविले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. निवड झालेल्या तिन्ही चित्रपटांच्या चमूचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षी एकूण २३ चित्रपटांचे प्रवेश प्राप्त झाले होते. त्यातून तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. या समितीमध्ये श्रीकांत बोजेवार, रसिका आगाशे, अर्चना बोऱ्हाडे, क्षितिजा खंडागळे, संदीप पाटील यांचा समावेश होता. या समितीने तिन्ही चित्रपटांची निवड एकमताने  केली.

निवड झालेला जिप्सी या चित्रपटाची निर्मिती ‘बोलपट’ या निर्मिती संस्थेने केली आहे. भेरा या चित्रपटाची निर्मिती ‘वैजप्रभा चित्र निर्मिती’ या संस्थेने केली आहे. तर ‘स्पेसटाइम एंटरटेंमेंट’ या चित्रपट निर्मितीसंस्थेने वल्ली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 चित्रपटांचा संक्षिप्त कथासार

“जिप्सी” : “जिप्सी” ही आयुष्यभर दिशाहीनपणे भटकणाऱ्या एका भटक्या जमातीतील कुटुंबाची गोष्ट आहे. ‘जोत्या’ या लहान मुलाला रोज भीक मागून आणलेले खराब, शिळं अन्न खावं लागत असल्याने त्याला ताज्या-गरमागरम पदार्थांचे खूप आकर्षक आहे. पण त्याला तसं खायला मिळत नसल्याने नेहमीच त्याला केवळ वासावरच भगवावं लागतं. यातून त्याला पदार्थांचे वास घ्यायची सवय लागते. तर दुसऱ्या बाजूला गरोदरपणातही भटकावं लागत असल्याने त्याच्या आईचा एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी संघर्ष चालू आहे. पुढे जोत्याला एका पदार्थाचा वास भारावून टाकतो. आणि शेवटी हा वासच त्याला आयुष्य बदलण्याची संधी देतो.

“वल्ली” : कथेचा नायक वल्ली, हा जोगता परंपरेचा अनुयायी आहे- प्राथमिक पुरुषाच्या शरीरात जन्मलेला आणि बहुरूपाने स्वतःला स्त्री म्हणून दर्शवणारा व्यक्ती. या दशकभरात, वल्लीला जाणवते की त्याचा खरा पुरुषार्थ अत्यंत उपेक्षित राहीलाय. शारिरीक हल्ले, सामाजिक उपहास आणि सार्वजनिक छळ सहन करत, वल्ली परंपरेच्या बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतो आणि शहरी जीवनातील कठोर वास्तवांना तोंड देण्यासाठी तारासोबत प्रवास सुरू करतो.

“भेरा” : ‘भेरा’ही कोविड काळात तळ कोकणातल्या एका दुर्गम गावात घडणारी २ निष्पाप जीवांची कथा आहे. गावात मुख्य वस्तीपासून लांब एकटी राहणारी अनिबाई, जी कोविड काळात मुंबईमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाची म्हणजेच सुरेशची आतुरतेने वाट पाहते आहे. अपेंडिक्सच्या त्रासाने त्रस्त अनिबाईला उरलेल्या जगाशी जोडणारा एकमेव दुवा म्हणजे जन्मतःच मूक बधीर असणारा विष्णू. अनाथ विष्णू जो आपल्या मामा घरी गुलामासारखा राहतो पण मायेसाठी आसुसलेला अनिबाईकडे आपुलकी पोटी येतो.

अनिबाई कुठे आहे याचा काहीही अंदाज नसलेला आणि एकीकडे आपल्या मित्राची सुरेशची वाट पाहणारा विष्णू अजूनच बिथरतो. याच अवस्थेत अचानक एक दिवस सरपंच सुरेशच्या अस्थी घेऊन अनिबाईच्या घरी येतो आणि पर्याय नसल्याने त्या विष्णूकडे सुपूर्त करतो. परिस्थितीने हतबल विष्णू ज्याच्यासाठी सगळी धडपड केली तो मित्र कायमचा सोडून गेला या धक्क्यात एकटाच अनिबाईची वाट बघत राहतो.
……………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!