जागा उपलब्ध होईपर्यंत पोलिसांची कारवाई नको

कल्याण दि. २७ मार्च : वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या बसेसवर सुरू करण्यात आलेली कारवाई थांबवावी आणि आम्हाला बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमेतील बस चालकांनी केली आहे. यासंदर्भात या बसमालकांनी गेल्या काही दिवसांत खासदार, आमदार आणि केडीएमसी आयुक्तांची भेट घेत ही मागणी केली आहे.

कल्याण पश्चिम परिसरात विविध नामांकित कंपन्यांच्या सुमारे 100 च्या आसपास खासगी बसेस आहेत. हे सर्व बस जण मुंबई बस मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेत  वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या बसेसवर नो पार्किंगची कारवाई केली जात आहे. त्याविरोधात हे सर्व बसमालक एकवटले असून त्यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. कल्याण शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना त्यामध्ये आमच्या बसेसच्या पार्किंगचाही विचार केला पाहिजे. आम्ही सरकारला दरमहिन्याला साधारणपणे 10 हजार ते 30 हजार पर्यंतचे कर भरतो. तरीही आमच्यावर ही नो पार्किंगची कारवाई का असा संतप्त सवाल मुंबई बस मालक संघटनेने केला आहे.
दरम्यान या सर्व बस चालकांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची भेट घेत त्यांना याप्रश्नी लक्ष घालण्यासाठी साकडे घालण्यात आल्याची माहिती मुंबई बसमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तर आम्हाला बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्याचे आवश्यक ते सर्व शुल्क भरण्यासही तयार आहोत. तसेच जोपर्यंत आम्हाला ही जागा उपलब्ध होईपर्यंत वाहतूक पोलिसांकडून सुरू असणारी ही कारवाई त्वरित थांबवण्याची मागणीही मुंबई बस मालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *