अमरावती – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. खासदार नवनीत राणांनी निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला. खासदार नवनीत राणा यांनी होळीनिम्मत मेळघाटातील आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप केले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या साड्या दिल्याचा आरोप करत बामादेही, कोरडा, चुरणी, ढाणा या गावात आदिवासी महिलांनी राणांनी वाटलेल्या साड्यांची होळी केली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवनीत राणा यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. राणांनी वाटलेल्या साड्या मच्छरदाणीसारख्या आहेत. त्या घालण्यायोग्य नाहीत, असे आदिवासी महिलांचे म्हणणे होते. राणांनी निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला होता. नवनीत राणा यांनी आमची थट्टा केली असा आरोपही या महिलांनी केला होता. या साड्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या महिलांनी राणा यांनी वाटलेल्या साड्यांची होळी केली.
या प्रकारावरून आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मेळघाटातील आदिवासी महिलांना मी सलाम करतो. त्यांना माझा मानाचा मुजरा आहे. १७ ते २० रुपयांच्या साडीचे वाटप करून लोकशाहीचे पतन करणारी लोक काही तयार होत असेल, तर त्याच पतन-हनन आपण केले पाहिजे. त्या लोकांना खांद्यावर घेऊन नाचावे असे मला वाटते. कारण, सध्या पैसा आणि सत्ता हे समीकरण झाले आहे. त्यामुळे बिगर पैशांचा कार्यकर्ता आता निवडणुकीतून हद्दपार होतो की काय याची भीती वाटते, म्हणून त्यांना मी मानाचा मुजरा अर्पण करतो.