नागपूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा देखील आता कमी झाला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उकाडय़ात वाढ होताना दिसून येत आहे. तापमानाचा पारा ज्या गतीने पुढे सरकत आहे, त्यावरून येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यातील तापमान वाढ थेट ४० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.
देशभरात एकीकडे होळी साजरी साजरी होत असतानाच महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात उष्णतेत वाढ होत आहे कोरडया हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात कोरडे हवामान आहे त्यातच दक्षिण भारताकडून महाराष्ट्राकडे उषणवारे वाहत आहेत त्यामुळे उन्हाचा कडाका वाढू लागला आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत येत्या २७ मार्च पर्यंत मुंबई पुणे विदर्भासह राज्याच्या अनेक भागात उन्हाची काहिली जाणवल्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरवर्षी एप्रिल मे महिन्यात उन्हाळयाच्या झळा जाणवत असत यंदा मार्च महिन्यात त्या जाणवू लागल्या आहेत. १९७० पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे १९७२ ते २०२४ या वर्षात एकदाही तापमानात घसरण नेादवली गेली नाही यंदाच्या मार्च महिन्यातही हीच स्थिती दिसून येत आहे
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या…
- उन्हात बाहेर जाताना गॉगल, रुमाल किंवा टोपी वापरा.
- फिकट रंगाचे, सैल आणि सुती कपडे घाला.
- पचायला हलका, कमी आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावे.
- टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी अशा फळांचे सेवन करा.
- नारळ पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवनानंतर ताक ही घ्यावे.
- घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा ठेवा.
- उन्हाळ्यात बचाव करण्यासाठी ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा ‘हायड्रेट’ करण्यास मदत होते.