मुंबई : दिल्लीचे  मुख्यमंत्री आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना यांच्या अटकेच्या  निषेधार्थ महाराष्ट्रात तीव्र  पडसाद उमटले आहेत.  दिल्लीसह परभणी, कल्याण, पिंपरी चिंचवड, बुलढाणा या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत अटकेचा निषेध व्यक्त केला,

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणामध्ये ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने स्पेशल बेंचकडे जाण्याचा सल्ला दिला, त्यापूर्वीच त्यांनी याचिका मागे घेतली. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेण्यात आली. अरविंद केजरीवाल यांचा जेलमधील मुक्काम वाढल्यानंतर पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केजरीवाल राजीनामा देणार का? राजीनामा दिला नाही तर सरकार कसं चालेल? दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्हा आम आदमी पक्षाकडून काळया फिती लावून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन करु असा इशारा ‘आप’ने निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

कल्याण तहसील कार्यालय बाहेर आज आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सामान्य जनतेसाठी काम केले. त्यांचे काम भाजपाला खपलेले नाही. याचा फटका भाजपाला बसेल म्हणून सुडापोटी त्यांच्यावर कारवाई केल्याचा आराेप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी केले. कल्याण येथे आपने केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात आंदाेलन केले.  

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पक्ष तसेच इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्याला बाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणा यांना पुढे करून कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *