डोंबिवलीतील शनीमंदिर जमीनदोस्त
डोंबिवली : प्रतिशनी शिंगणापूर म्हणून ओळखले जाणारे सांगाव येथील शनीमंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामावर गुरुवारी कारवाई करीत जमीनदोस्त करण्यात आली. मात्र शनिमंदिराची शिळा कायम ठेवण्यात आलीय. एमआयडीसीच्या जागेवर बेकायदेशीर पणे हे मंदिर उभारण्यात आल्याने ही कारवाई केल्याची माहिती एमआयडीसी च्या एका अधिकाऱ्याने दिली.
डोंबिवली पूर्वेतील सांगाव येथील एमआयडीसीच्या जागेवर शनी मंदिर बांधण्यात आले होते. गेल्या 10 वर्षात मंदिर परिसरात मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आली होती. प्रतिशनी शिंगणापूर म्हणून ओळखले जात होते. शनीचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी भक्तांची खूपच गर्दी असायची. तसेच अनेक विधी पूजा याठिकाणी होत. त्यामुळे हे मंदिर नेहमी भक्तांनी गजबजलेले असायचे. आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात हे मंदिर पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आले. सुरुवातीला काहींनी कारवाईस विरोध दर्शविला, मात्र विरोधाला न जुमानता ही कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत प्रार्थना स्थळ व मंदिरावर कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसारच मंदिरांवर जोरदार कारवाई सूरु आहे. त्याचाच हा भाग असल्याचे एमआयडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीतील मंदिरांवर कारवाईचा सपाटा सुरू आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामाच्या मजलेच्या मजले उभे राहत असताना त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा केला जातो मात्र मंदिरांवर कारवाई केली जात असल्याने डोंबिवलीकरांमद्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.