आदिवासींच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका :
ठाणे जि.प.व पंचायत समितीच्या निवडणुकीत श्रमजीवी संघटनेचा भाजपला बिनशर्थ पाठिंबा
भिवंडी : ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक तसेच पालघर ,नाशिक ,रायगड जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत.या जिल्ह्यातील आदिवासींचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांना आश्वासन दिल्याने अखेर श्रमजीवी संघटनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय.
भिवंडी तालूक्यासह ठाणे ,पालघर ,नाशिक ,रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात श्रमजीवी संघटनेचे वर्चस्व असल्यामुळे निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील विविध गटांमध्ये भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये सामील होत आहेत.त्यातच आता श्रमजीवी संघटनेनेही भाजपला गुरुवारी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे भाजपची स्थिती अधिकच मजबूत झाली आहे.भाजपचे खासदार व ठाणे विभागीय अध्यक्ष कपिल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्यासोबतच श्रमजीवी संघटनेनेचे प्रदेश अध्यक्ष रामभाऊ वारणा,उपाध्यक्षा आराध्या पंडीत,सरचिटणीस बाळाराम भोईर,उपाध्यक्ष अशोक सापटे,जिल्हाध्यक्ष दत्तू कोलेकर यांनी पत्रकार परिषदेत हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला.गरीबांच्या प्रश्नांवर सकारात्मक उपाययोजनांसाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे श्रमजीवी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्याचा विकास कसा होईल याकडे मुख्यमंत्र्यांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.श्रमजीवी संघटनेने ज्या विश्वासाने पाठिंबा दिला आहे.तो सार्थ ठरविण्याचे काम आम्ही करू याची शाश्वती देत आहोत अशी ग्वाही खासदार कपिल पाटील यांनी यावेळी दिली.भाजप,श्रमजीवी आणि रिपब्लिकन पक्षाची युती प्रत्येक घटकापर्यंत विकास पोचवेल असे आश्वासन खासदार पाटील यांनी दिले.त्याचबरोबर श्रमजीवी संघटनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रमजीवी संघटनेला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.संघटनेने मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक धोरण जाहीर करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना दिले आहे.त्यामुळेच भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे उपाध्यक्षा आराध्या पंडित यांनी सांगितले.
तर श्रमजीवी कार्यकर्त्यांना उमेदवारी : पाटील
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्याची इच्छा दाखविल्यास निश्चितच चर्चा करून उमेदवारी दिली जाईल अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.