मूलभूत आणि पायाभूत सुविधामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान
महाड : अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळई गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोणेरे येथे तळई गावातील काही ग्रामस्थांना घराच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. गावात मुलभूत आणि पायाभूत सुविधामुळे बहुतांश ग्रामस्थ हक्काच्या घरात राहायला आली आहेत. उर्वरित ग्रामस्थांनाही लवकरच घरे मिळणार आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे.
तळई गावासह आजूबाजूच्या पाड्यातील सुमारे २५० हून अधिक घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्य सरकारने म्हाडावर सोपविली आहे. तीन वर्षांनी जानेवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोणेरे येथे झालेल्या कार्यक्रमात तळई गावातील काही ग्रामस्थांना घराच्या चाव्याचे वाटप करण्यात आले. कोकणातील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा लक्षात घेता तळई गावातील घरे बनविली आहेत.
घरांच्या भिंती अतिशय मजबूत आहेत. सिमेंट केमिकल्सचा वापर करून लाईट वेट काँक्रीट पॅनल तयार करण्यात आले आहे. घरांच्या भिंती फायर प्रूफ आहेत. गावातील पाणी आणि विजेची समस्या सोडविण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले की, सरकारने वाटप केलेल्या घरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी टंचाई असल्यास टँकरने पाणी पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रत्येक घरावर सोलर पॅनल
प्रत्येक घरावर सोलर पॅनल आणि वॉटर हार्वेस्टिंगसाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणावर वादळवारा असल्याने अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्यासाठी घरांच्या छतावर सोलार पॅनल बसवले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही. पावसाळ्यातील पाणी अडविण्यासाठी पाण्याच्या मोठ्या टाक्या बसविल्या आहेत.
घराच्या भिंती फायर प्रूफ
तळई गावातील घरांच्या भिंती फायर प्रूफ आहेत. घराच्या भिंतीसोबत छतही कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. कोकणात मुसळधार पाऊस असल्याने त्याचा आवाज होऊ नये आणि तापमान कंट्रोल करण्यात यावा, यासाठी पफ आयसोलेशन असलेले पत्रे तयार केले आहेत. फायर प्रूफ भिंत आणि पफ आयसोलेशन असलेले घराचे छत आहे. प्रत्येक घरात हॉल, बेडरूम, किचन आणि शेतीच साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा आहे.