डोंबिवली : येथील एमआयडीसी निवासी विभागातील गौरी नंदन सोसायटी आर एच 122 जवळ मोठ्या नाल्यावरील रस्त्याच्या वाढीव पुल, आरसीसी भिंतीचे बांधकाम, सांडपाणी चेंबर्स, आदींचे काम एका वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. परंतु सदर बांधकाम गेले वर्षभर बंद असून अर्धवट स्थितीत तसेच पडून आहे. या बांधकामातील लोखंडी सळ्या बाहेर आल्या असून आता त्या गंजल्या आहेत. असे अर्धवट स्थितीतील बांधकाम आजपर्यंत का पडून आहे ? या संदर्भात एमएमआरडीए आणि एमआयडीसी प्रशासनाकडून काहीच माहिती मिळत नसल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या अर्धवट बांधकामामुळे नाल्यातील वाहते सांडपाणी अडल्याने साचून राहून दुर्गंधी सुटते. शिवाय डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एखादे वाहन सदर पुलावरून जाताना जर अपघात होऊन नाल्यात गेले तर तेथील बाहेर आलेल्या गंजलेल्या लोखंडी सळ्या लागून चालकासह वाहनातील प्रवाशांना मोठी इजा होऊ शकते. स्थानिक आमदार खासदार यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून या त्रासातून कधी मुक्तता होते हिच वाटत पाहत आहेत.
एमआयडीसीमध्ये रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. काही ठिकाणी नाल्यावरील पुल अरुंद असल्याने रस्त्यांची रुंदी वाढण्यासाठी अशी कामे सुरू आहेत. त्यात सांडपाण्याचे चेंबर्स आणि संरक्षक भिंती बांधण्याचे काम होणार होते. पावसाळ्याच्या दिवसांत या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. अशा धोकादायक आणि अर्धवट स्थितीतील नाल्यावर करण्यात आलेल्या बांधकामामुळे एखादी दुर्घटना होऊ शकते. प्रशासनाने अशी अर्धवट बांधकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा या भागातील रहिवासी व्यक्त करत आहेत.