डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहेत. यावरून मनसेने मात्र या जागा वाटपाच्या तिढ्यावरून सत्ताधा-यांना चांगलाच टोला हाणलाय. लोकसभेचं सोडा विधानसभेला तर जागा वाटपावरून हे एकमेकांची डोकी फोडतील अस सांगत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला या दरम्यान जागावाटपा वरून धुसफूस आली, एकंदरीतच या तिढ्यावरुन आमदार राजू पाटील यांनी मिश्किल आणि काहीशा कडवट शब्दात या सर्व राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. लोकसभेत फार काही नाही पण विधानसभा निवडणुकीच्या वेळेला खूप मनोरंजन होणार आहे. इतकंच नाही तर जागावाटपावरून हे लोक एकमेकांची डोकी फोडतील असही ते म्हणाले.
मनसेच्या वर्धापनदिनाची तयारी जोरात सुरु असून आम्ही 18 व्या वर्षात पदार्पण करत आहोत, आता आम्ही पण वयात आलो. काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो, त्याही आता आम्ही करणार. लोकांचं प्रेम मिळत होत पण मतदानाला प्रतिसाद मिळत नव्हता, मात्र यावेळेस काही भूमिका राजकारणाला साजेशाही घेऊ शकतो. शेवटी आम्हालाही राजकारण करायचं आहे. लोकांच्या अपेक्षा आहेत की राज ठाकरे यांनी राज्याच नेतृत्व करावं त्या अनुषंगाने वर्धापण दिनाला काही सूतोवाच केले जाऊ शकतात अस सांगत राजु पाटील यांनी एकप्रकारे मनसे लवकरच निवडणुकीबाबत त्यांची भूमिका जाहीर करू शकते असे सूतोवाच केले आहे.
कल्याण लोकसभेत दोन्ही वेळेला मनसेला लाखाच्यावर मतदान झालं आहे, दोनाचे चार पक्ष झाले, सत्ता विरोधी वातावरण आहे. काम झाली असली तरी लोक समाधानी राहू शकत नाही हा एक नियम आहे. विरोधी वातावरणही आहे. त्यातच राजकीय चढाओढीतून कल्याण पूर्वेतील काय राजकीय ( गोळीबार सारख्या ) घटना घडल्या आहेत. त्यामुळे नाराजीच वातावरण आहे. या नाराजीचा फायदा घायचा असेल तर त्याबाबत पक्ष निर्णय घेतील त्याला आम्ही तयार आहोत असं आमदार पाटील म्हणाले.