मुंबई :  राज्यातच नाही तर देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सकाळपासूनच  शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली असून दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. 

 माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त या दिवशी शंकराची मनोभावे पूजा करून उपवास  करतात.  या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक केला जातो.    शिवमंदिरात भाविकांनी शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दही, तूप, मध, साखरमिश्रित पंचामृत अर्पण करीत जलधारांनी शिवाभिषेक केला. काही मंदिरांमध्ये रुद्र अष्टाध्यायीचे पठण करण्यात आले; तर काही ठिकाणी शतपथ ब्राह्मण ग्रंथ रचित मंत्रोच्चाराने शिवअर्चना आणि महाभिषेक करण्यात आला. रुद्र सूक्त, नमक चमक यांची आवर्तनेही करण्यात आली.  नागेश्वर शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.  

 त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.  हे शिवमंदिर  नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.  हे मंदिर हिंदूंच्या श्रद्धेचे प्रमुख स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या देवता तिथे विराजमान आहेत.     नाशिक शहरात गोदावरी किनारी, रामकुंड परिसरात कपालेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. कपालेश्वर महादेव मंदिराला जवळपास सातशे वर्षांचा इतिहास आहे. मार्लेश्वर मंदिर रत्‍नागिरी जिल्ह्यामधील लेणी मंदिर आहे. या मंदिराच्या शिवलिंगाला नागांनी वेढले असून ते कोणाला इजा करत नाहीत असे म्हटले जाते.  पुणे जिल्ह्यातील  भुलेश्वर मंदिर  प्राचीन हिंदू मंदिर आहे. या मंदिरच्या गर्भगृहात ५ शिवलिंग आहेत. येथील शिवमंदिराला भुलेश्वर, महादेव, यवतेश्वर मंदिरही म्हटले जाते. ठाणे जिल्हयातील अंबरनाथ येथे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर वडवण नदीच्या काठावर वसलेले आहे. अंबरनाथ शिवमंदिर हेमाडपंथी शैलीसाठी ओळखले जाते. या प्राचीन मंदिरात महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.  हरिहरेश्वर मंदिर पश्चिम घाटाच्या उंच पर्वतांनी वेढलेले आहे. भगवान शिव, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि माँ योगेश्वरी या मंदिराच्या मुख्य देवता आहेत. पुणे जिल्हयातील भीमाशंकर मंदिर  हे मंदिर घनदाट जंगलात वसलेले आहे. भीमाशंकर हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. असे मानले जाते की, त्रिपुरासुर राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान शंकराने भीमाचे रूप धारण केले होते.

  मुंबईतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. या मंदिरात भगवान शंकरासोबतच गणपती, हनुमान आणि देवी पार्वती यांच्या देखील मूर्ती आहेत. वेरुळ येथे कैलास मंदिर वसलेले आहे. ही राष्ट्रकूट राजघराण्याची रचना आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ एका दगडात कोरलेले आहे. या मंदिरातील कोरीव काम या मंदिराचे सौंदर्य वाढवते. संभाजीनगर जिल्ह्यात असलेले घृष्णेश्वर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. कैलास मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीमध्ये बांधले गेले आहे. यामध्ये रेखीव कोरीव काम केले आहे. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात भगवान शंकराचे शिवलिंग आहे. सर्वच शिवमंदिरात भक्तांची रिघ लागली असून भाविकांकडून मनोभावे पूजा केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!