२९ नोव्हेंबरला फेरीवाल्यांचा एल्गार ; आझाद मैदानात धरणे आंदोलन
मुंबई : रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिका आणि पोलिसांनी उगरलेला कारवाईचा बडगा आणि मनसे कडून फेरीवाल्यावर होणारी मारहाण या निषेधार्थ मुंबईतील फेरीवाला संघटना एकवटल्या असून, फेरीवाला एकजूट संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या संघर्ष समितीच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती आझाद हॉकर्स युनियनचे दयाशंकर सिंह यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
फेरीवाला हा समाजाचा घटक असून त्यांनाही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. फेरीवाल्यांच्या व्यवसायासंदर्भात पथविक्रेता अधिनियम २०१४ मंजुर करण्यात आलाय. त्या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ पर्यंतचे फेरीवाले संरक्षित आहेत. त्यामुळे त्यांना हटविण्यात येऊ नये. अनेक वर्षांपासून ज्या रस्त्यावर फेरीवाले व्यवसाय करीत आहे त्याच रस्त्यांना फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, नवीन रस्ते अथवा फूटपाथ फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात असेही सिंह म्हणाले. तसेच टाऊन व्हेडिंग कमिटीची अंमलबजावणी करावी ,कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. संघर्ष समितीत आझाद हॉकर्स युनियन, जनवादी हॉकर्स सभा, आयटक हॉकर्स युनियन, शहिद भगतसिंह हॉकर्स युनियन, लोहिया विचार मंच, मुलुंड हॉकर्स संघ, हिंदुस्तान हॉकर्स युनियन आदी संघटना सहभागी झाल्या आहेत.