मुंबई : बार्टीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन फेलोशिपसाठी मुंबईतील आझाद मैदानात ४३ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र या आंदोलानाकडे सरकारचे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात दंग असलेल्या सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारविरोधात सर्वसामान्यांचा रोष वाढत आहे.
आज ४३ दिवस झाले आम्ही बार्टीचे ७६१ संशोधन फेलोशिपचे विद्यार्थी आंदोलन करत आहोत. सरकारने अद्यापही आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. धूळ उन,वारा,दुर्गंधी यामुळे विद्यार्थी आजारी पडले आहेत .तरीही सरकार शांत बसले आहे. यापूर्वी आम्ही वर्षा बंगल्यावर धडक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.आता नेमके काय करावे म्हणजे आमच्या मागण्या मान्य होतील ? असा सवाल या विद्यार्थ्यानी सरकारला केला आहे.
रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ समाजसेवक पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी बुधवारी या आंदोलनाला भेट दिली असता शेजवळ म्हणाले,अनुसूचीत जातीच्या या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सारथी च्या १२२६ विद्यार्थ्यांना व महाजोती च्या ८५६ विद्यार्थ्यांना मोठी आर्थिक मदत केली आहे. मग बार्टीच्या मुलांकडे दुर्लक्ष का ? असा सवाल त्यांनी केला.
रिपब्लिकन युथ फेडरेशन चे अध्यक्ष प्रकाश तारू यावेळी म्हणाले की , मंत्रिमंडळ बैठकीत सरकार निर्णय घेते मग त्याची अंमलबजावणी करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट का होत नाही.संशोधन विद्यार्थी जर आझाद मैदानात आजारी पडत असतील तर सरकार गंभीर का नाही. ओबीसी मराठा मुलांना भरघोस शिष्यवृत्ती मग आम्हा अनुसूचीत जातीच्या मुलांना आंदोलन करण्यास सरकार का भाग पाडत आहे. असा सवाल प्रकाश तारू यांनी यावेळी केला.