मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालेले नाही. अजूनही काही जागांवर बोलणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज मविआची मुंबईत दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रकाश आंबेडकर या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडल्यानंतरच राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटप संदर्भातील फॉर्मुला मसुदा जाहीर केला जाणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने २३ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तर काँग्रेसने २२ जागांवर दावा केला आहे.  प्रकाश आंबेडकरांकडून आम्ही किमान सहा जागा जिंकू शकतो असं सांगितलं होतं. अकोल्याच्या जागेवर स्वत: प्रकाश आंबेडकर उभे राहणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांवर बोलणी सुरू आहे. दुसरीकडे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चेच्या फेऱ्या संपलेल्या नाहीत. त्यामुळे ऐनवेळी यातील काही मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते. यामध्ये वर्धा, हिंगोली, अकोला आणि भिवंडी आदी मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी  दादर येथील टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निवड समितीने दिवसभरात २० लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यापैकी जवळपास १५ जागा गेल्या लोकसभेला पक्षाने लढल्या होत्या.  त्या जागांवर कामाला लागण्याची आदेश काँग्रेसकडून कार्यकत्यांना देण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *